चालकाने बस थांबवली नाही; महिलेने रिक्षातून केला ११ किलोमीटर पाठलाग   

नाशिक : मुसळधार पावसात मंगळवारी सायंकाळी एका महिलेने नाशिक सिटी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने बस थांबवली नाही. याच रागातून महिलेने आपल्या लहान मुलासह रिक्षाने बसचा ११ किलोमीटर पाठलाग केला. त्यानंतर महिलेचा रूद्रावतार पाहायला मिळाला. महिलेने चालकाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला.
 
मुसळधार पावसात महिलेने सिटी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने बस थांबवलीच नाही. ती आपल्या लहान बाळासह बसच्या मागे धावली, तरी देखील बस निघून गेल्याने ती संतप्त झाली होती. त्यानंतर महिलेने निमाणी बस स्थानकापासून ते नाशिकरोड पर्यंत असा ११ किलोमीटरपर्यंत रिक्षाने बसचा पाठलाग केला. नाशिकरोड बस स्थानकात बस थांबल्यानंतर तिने बसचालकाची कॉलर पकडून त्याला बस न थांबवल्याचा जाब विचारला. त्यावर, तुम्ही मारहाण करू नका, हवे तर माझी तक्रार करा, असे बस चालक म्हणाला. त्यानंतर स्थानिक प्रवाशांनी मध्यस्थी करत महिलेला शांत केले. या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाली आहे.
 

Related Articles